
नांदिवसे राधानगर परिसरात अतिवृष्टीने डोंगराला भेगा
चिपळूण:- तालुक्यातील दसपटी भागात नांदिवसे राधानगर परिसरात अतिवृष्टीने डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेले दोन-तीन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. चिपळुणात गेल्या २४ तासांत १०० मि.मी. हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नांदिवसेच्या डोंगरामध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. याबाबत तातडीने प्रशासनाला माहिती देण्यात आली. यानंतर तत्काळ प्रांताधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली.
गुरुवारी रात्रीच्यावेळी या भेगा पडल्याचे सांगण्यात येत आहे. याची दखल युवा सेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले व या ठिकाणी पाहणी करण्यात आली. तालुकाप्रमुख निहार कोवळे, उपशहरप्रमुख शुभम कदम, अमेय चितळे, ओंकार नलावडे आदी उपस्थित होते व त्यांनी या ठिकाणी पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला. प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली असून लोकांना धोका पोहोचल्यास स्थलांतर केले जाईल व खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना कराव्यात या बाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली असून प्रशासनाने याची नोंद घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.