
यंदाच्या हंगामात अमेरिकेला हापूसची विक्रमी निर्यात
रत्नागिरी :अवेळी पडलेला पाउस व बदलत्या हवामानाचा फटका यावर्षी हापूसला मोठ्या प्रमाणात बसल्याने आंबा पिक एकदम कमी आले होते. त्यात दिलासा दायक बाब म्हणजे वाशी येथील निर्यात केंद्रातून यंदा 974 हून अधिक टन आंब्याची निर्यात झाली. त्यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक 806 टन आंबा गेला असून, उत्पादकाला चांगला दर मिळाला आहे. यामध्ये हापूस ७० टक्के असून उर्वरित केसर, बैगनपल्ली या आंब्याचा समावेश आहे.
यंदा कोकणातील हापूस कमी असल्यामुळे स्थानिक बाजारात दरही टिकून होते. त्यामूळे निर्यातीला आंबा कमी जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यासाठी पणन मंडळाकडून जास्तीत जास्त आंबा निर्यातीचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुंबईतील वाशीच्या निर्यात केंद्रातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. आवश्यक परवानग्याही वेळीच घेण्यात आल्या होत्या. अमेरीकेमधील निरीक्षकाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर एप्रिल महिन्यात निर्यातीला सुरूवात झाली. मे अखेरपर्यंत हापूसची निर्यात करण्यात यश मिळाले. मे महिन्यात अधिक निर्यात झाल्याचे पणनकडून सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी 576 टन आंब्याची निर्यात झाली होती. यावर्षी 974.89 टन इतकी निर्यात झाली, याला पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलींद जोशी यांनीही दूजोरा दिला.
निर्यातीमध्ये जपानला 41.64 टन, न्यूझीलंडला 86.26 टन, दक्षिण कोरियाला 3.88 टन, युरोपियन देशांना 8.60 टन तर अमेरिकेत सर्वाधिक 806 टन, आॅस्ट्रेलीया 27.29, मलेशियाला 0.464 टऩ इतकी निर्यात करण्यात आली आहे. यामध्ये हापूसचा टक्का सर्वाधिक आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रातून ही निर्यात करण्यात आली आहे. पणन मंडळाच्यावतीने वाशी येथे अत्याधुनिक निर्यात केंद्राची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. देशभरात उत्पादीत होणार्या आंब्याची याठिकाणाहून निर्यात केली जात आहे. वाशी बाजारात येणार्या आंब्यातील दर्जेदार आंबा निवडून निर्यात करण्यात येत असते.