
बेपत्ता तरुणाचा सापडला मृतदेह वाशिष्ठीत
चिपळूण : शहरातील राधाकृष्ण नगर येथील रहिवासी असलेला तरुण आदित्य योगेश आठवले (२०) हा रविवारी सकाळपासून बेपत्ता झाला होता. मात्र, मंगळवारी सकाळी वाशिष्ठी नदीपात्रात कळंबस्ते हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
आदित्य आठवले हा रविवारी सकाळी लवकर घरातून जाताना त्याने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. मात्र, मोबाईल व पैसे सोबत नेले नव्हते. त्यामुळे त्याचा कोठे ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर योगेश आठवले यांनी पोलिसांत धाव घेऊन आदित्य बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी सोमवारी व मंगळवारी शोध घेतला असता त्याचा मृतदेह कळबंस्ते येथे वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.