
आरएचपी फाउंडेशनतर्फे सुरेखा गोलटकर यांना व्हिलचेअर प्रदान
रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील दिव्यांग महिलेस व्हिलचेअर प्रदान करण्यात आली. यामुळे या महिलेस घरात फिरणे सोपे झाले आहे. पूर्वी त्यांना उचलून न्यावे लागेल, परंतु आता बाहेर जायचे असल्यास व्हिलचेअरवरून जाता येत असल्याने कुटुंबीयांचा त्रास थोडा कमी झाला आहे.
गावडे आंबेरे येथील सुरेखा बळवंत गोलटकर यांना डॉर्फिझम म्हणजे जन्मत:च उंची कमी असणाचे अपंगत्व आहे. हातापायाची उंची कमी असल्याने बुटकेपणाचे अपंगत्व आहे. सध्या त्या ५० वर्षांच्या आहेत. सात भावंडांमध्ये या सर्वात लहान. बाकी सर्व भावंड सुदृढ आहेत. या १२ वर्षांच्या असताना वडील आणि ४० वर्षांच्या असताना आईचे निधन झाले. आता त्या भावांच्या मुलांसोबत राहतात.
सुरवातीला त्या चालायच्या. घरातील काम करायच्या. गुरे घेऊन शेतात जायच्या. पण साधारण २० वर्षांपासून त्यांचे चालण कमीकमी होत गेलं आणि अपंगत्व वाढत गेलं. सर्व गोष्टी घरातच जागेवर कराव्या लागतात. कुठेही घेऊन जायचं असेल तर उचलून न्यावे लागते. रत्नागिरीतील रिक्षाचालक शुभम हळदणकर यांच्याकडून रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनची (आरएचपी) माहिती भाचा अमोल गोलटकर यांना मिळाली. त्यांनी संस्थेला भेट देऊन सुरेखा यांची सविस्तर माहिती दिली.
आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांनी सुरेखा गोलटकर यांना ने- आण करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून संस्थेतर्फे नवीन व्हीलचेअर दिली. सुरेखाचे घर गावात असल्याने चढ-उतार, पायर्या आणि अडचणीचे आहे. आता तिला व्हिलचेअर मिळाल्याने दवाखान्यात नेताना व्हीलचेअरवरुन रिक्षापर्यत आणता येते. रस्ता खाचखळग्यांचा आणि छोट्या पायवाटेचा असल्याने व्हीलचेअरचा वापर करणे खूप जोखमीचे झाले तरी आधी घरच्यांना सुरेखाला उचलूनच न्यावे लागायचे. तो त्रास व्हीलचेअरमुळे थोडा कमी झाला आहे. व्हिलचेअर देताना संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे, रिक्षाचालक शुभम हळदणकर, संतोष गजने, भाजा अमोल गोलटकर, सौ. अदिती गोलटकर, मुलगी अद्विका गोलटकर आदी उपस्थित होते.