
बेकायदेशीरपणे जुगार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
खेड :भरणे येथील मराठी शाळेजवळील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी रवींद्र मधुकर बसणकर याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरणे ग्रामपंचायत व मराठी शाळेच्या जवळील मोकळ्या जागेत पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने धाड टाकली. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांसह गावठी हातभट्ट्यांवर धाडी टाकण्याचे येथील पोलिसांचे सत्र सुरूच असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.