
शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात पालकांची लगबग
रत्नागिरी :शाळा आजपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शालेय साहित्य खरेदीसाठी बच्चेकंपनीला सोबत घेऊन पालकांची लगबग सुरू असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत आहे. थ्रीडी कार्टुनचे चित्रे असलेली स्कूलबॅग, छोटा भीम, डोरेमॉन यांच्यासोबतच सेलीब्रेटींचे चित्र असलेले नोटबुक, पेन्सिलसोबतच जंबो खोडरबर, शार्पनर अशा विविध साहित्यांनी भरलेली कंपासपेटी, वेगवेगळ्या शाळांचे गणवेश, नवीन बूट, टाय अशा खरेदीवर भर दिसून येत आहे.
जिल्ह्यात शाळा आजपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठा शालेय साहित्यांनी गजबजून गेल्या आहेत. शाळेचा पहिला दिवस जवळ आल्यामुळे ऐनवेळेस घाई नको म्हणून पालक आतापासूनच पाल्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, बूट, रेनकोट, छत्री, गणवेश आदी साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टुन, गाड्यांची चित्रे, खेळाडूंचे फोटो यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. लहान मुलांना आवडतील अशा भडक रंगांच्या, कार्टुन्सचे कव्हर असलेल्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग, कंपास उपलब्ध आहेत.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध रंगांच्या व आकाराच्या बॅग्ज बाजारात आल्या आहेत. स्कूलबॅगप्रमाणेच यंदा कार्टुनचे चित्र असणारे प्लास्टिक कंपास बॉक्स बाजारात उपलब्ध असून त्यांची किंमत 30 ते 350 रुपयांपर्यंत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शालेय साहित्यांच्या किमतीमध्ये 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. . एका वहीमागे 7, 10, 15, 20 असा फरक पडला आहे. गेल्यावर्षी शंभर पानी वही 150 रुपये डझन होती. ती सध्या 270 ते 280 रुपये डझन, दोनशे पानी वही 300 रुपये डझनची आता 420 रुपये डझन, फुलस्केप पानी वही 400 रुपये डझन होती ती 540 रुपये, अशा दराने उपलब्ध आहेत.
पालक व विद्यार्थी नोटबुक खरेदी करताना क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार यांचे चित्र असलेल्या नोटबुकपेक्षा निसर्गचित्र असलेल्या नोटबुकला पसंती देत असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. बच्चेकंपनीचा ओढा मात्र कार्टुन चित्र असलेले नोटबुक खरेदी करण्याकडे कायम आहे. याशिवाय कॉलेज विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन विक्रेत्यांनी बाईक्स, कार या चित्रांच्या वह्या उपलब्ध करून दिल्या आहेत.