
कुंपणानेच खाल्ले शेत; बँकेच्या कॅशियरकडून १ लाख ६१ हजारांचा गंडा
रत्नागिरी :लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा बँकेच्या चलनात मिसळून फसवणूक केल्याचा महापराक्रम कॅशिअरने केला आहे. बनावट नोटा ठेवून तब्बल १ लाख ६१ हजार ५०० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या कॅशिअरविरोधात शहर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोट्या नोटा चलनात आणून फसवणूक होते असे ऐकिवात आहे. आता मात्र या बनावट नोटा -बँकेच्या नोटांमध्ये मिसळून वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे बँकेतील अधिकारी, कर्मचारी चांगलेच हडबडले असून हा पराक्रम करणाऱ्या कॅशिअरविरोधात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीतील एका बँकेत कॅशिअर पदावर कामावर असणाऱ्या अक्षय चंद्रकांत वेशवीकर याने नोव्हेंबर २०२२ ते ८ जून २०२३ या कालावधीत संबधित बँकेची फसवणूक केली आहे. यातील कॅश काऊंटरवर असलेल्या ५०० रूपयांच्या प्रत्येकी १०० नोटांच्या ४ बंडल तसेच अशी १० बंडल असलेल्या स्ट्रॉंग रूममधील रिममध्ये एकूण १४ बंडलमध्ये ५०० रूपयांच्या ३२३ लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा मिसळून बँकेची १ लाख ६१ हजार ५०० रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बँक कॅशिअर असलेल्या संशयित अक्षय चंद्रकांत वेशवीकर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.