
बारसूतील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक पहाणी करणार
राजापूर:- बारसूच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. युनेस्कोनेही बारसूतील कातळशिल्पाला वारसास्थळ जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहेअशावेळी कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प लादू नये, अशी मागणी जोर धरत आहे. 13 जून रोजी सकाळी 10 वाजता बारसू परिसरातील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक पहाणी करणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत सहभागी होणार आहेत.
बारसूच्या सडय़ावर असलेली कातळशिल्प हा आता राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा विषय झाला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू ते देवाचे गोठणे येथील सडय़ावर पसरलेली कातळशिल्प संरक्षित करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथील पंचक्रोशीतील सर्वच ग्रामसभांनी तसे ठरावही केले आहेत. यातील काही कातळशिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ घोषित होण्याच्या मार्गावर आहेत. हाच जागतिक वारसा संरक्षित करण्यासाठी येथे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित होऊ नये ही मागणी ग्रामस्थ करत आहेत.बारसू परिसरातील कातळशिल्पांची पाहणी खासदार विनायक राऊत देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक यांच्या समवेत 13 जून रोजी सकाळी 10 वाजता स्थानिक ग्रामस्थांना घेऊन करणार आहेत. या संशोधकांमध्ये डॉ. पार्थ चौहान, मृदुला माने, जिग्ना देसाई, डॉ. प्रबिन सुकुमारन आणि अभ्यासकांमध्ये सुधीर रिसबुड, सतीश लळीत आदींचा समावेश असेल.