
वाघ्रट येथील चिरेखाणीवर दोन गटात हाणामारी
लांजा : चिरेखाणीवर चिरे भरण्यासाठी लावलेल्या नंबरवरून दोन ट्रक मालकांमध्ये वादावादी होऊन दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये लोखंडी राॅडने केलेल्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाघ्रट येथील चिरेखाणीवर घडली आहे. या प्रकरणी गुरुवारी ८ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुभाष दादासो भुसनर (राहणार हटकर मंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर) हा लांजा तालुक्यातील वाघ्रट येथील रमेश भोजे यांच्या चिरेखाणींवर चिरे भरण्यासाठी बुधवारी सायंकाळी आला होता. चिरे भरण्यासाठी त्याने आपला ट्रक (क्रमांक एम एच १०, सीआर ९०८१) हा नंबरमध्ये लावला होता. याच दरम्यान त्याच्या पाठीमागे उभा असलेल्या ट्रक चालकाने आपला ट्रक (क्रमांक एम एच १३, सी यु -४७०७) हा फिर्यादी सुभाष भुसनर यांच्या ट्रकच्या पुढे नेऊन उभा केला .आपण ट्रक नंबरवर लावला असताना तू माझ्या पुढे येऊन आपला ट्रक उभा का केलास? याचा जाब सुभाष भुसनर याने या ट्रक चालकाला विचारला. यावरून त्यांच्यामध्ये वादावादी होऊन शिवीगाळ, दमदाटी करण्याचा प्रकार झाला. त्यानंतर दोन गटात लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात झाली.
या मारहाणीत ट्रकमालक सुभाष भुसनर याच्यासह उमेश तायप्पा कोळेकर (राहणार आरेवाडी तालुका कवठेमहाकाळ जिल्हा सांगली) याच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच मोहन बबन पाटील (राहणार कवठेपिरान तालुका मिरज, जिल्हा सांगली) याच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली. या मारहाणीमध्ये फिर्यादी सुभाष भुसनर हा खाली पडल्याने त्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन आणि पॅन्टच्या खिशात ठेवलेले २० हजार रुपयांपैकी १७५०० रुपये गहाळ झाले आहेत.
फिर्यादी सुभाष भुसनर व अन्य दोघांना झालेल्या मारहाणी मध्ये संबंधित ट्रक चालकाला खाणमालक रमेश भोजे (राहणार सापुचेतळे तालुका लांजा) व त्यांचे अन्य दोन कामगार यांनी मदत केली. याप्रकरणी सुभाष भुसनर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी रमेश भोजे यांच्यासह चौघांवर भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे हे करत आहेत.