
केद्रप्रमुख संघाचे उमेदवार निश्चित
प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुक
रत्नागिरी : प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना आपले उमेदवार उभे करणार आहे. अशी माहिती केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्रप्रमुख संघटना कार्यरत असून जिल्ह्यातील सभासदांच्या मागणीनुसार निवडणुक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंडणगड ते राजापूर असा जिल्ह्याचा दौरा करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
संस्थेच्या सभासदातून जिल्ह्यात प्रत्येक तालुका कार्यक्षेत्रातील सभासदांनी निवडलेले ९ तालुक्यांसाठी प्रत्येक तालुक्यालाb १ संचालक याप्रमाणे ९ संचालक निवडले जातात. मात्र, केंद्रप्रमुखांची तालुकानिहाय संख्या कमी असल्याने जिल्हा राखीव जागांसाठी उमेदवार उभे करुन निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी सांगितले.
पतपेढीच्या सभासदातून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सभासदांनी जिल्हा कार्यक्षेत्रासाठी राखीव उमेदवारांना मतदान करुन निवडायचे असते. राखीव जागांसाठी जिल्हा मतदार संघ असल्याने जिल्ह्यातील अंदाजे ५८३७ सभासद असल्याने केंद्रप्रमुख संघटनेला निवडणुक लढविणे सोपे जाणार आहे. कारण सभासदांजवळ सर्व केंद्रप्रमुख यांचे सतत समन्वय असल्याने जिल्हा राखीव उमेदवारीला त्याचा उपयोग होणार असल्याचे शिर्के यांनी सांगितले. राखीव जागांसाठी जिल्हा मतदार संघ असल्याने संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा क्षेत्र सर्वसाधारण व राखीव इतर मागास प्रवर्ग या दोन राखीव जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष शिर्के यांनी स्पष्ट केले.