
जिल्ह्यात पर्यावरण दिनी श्रमदान मोहीमेतून प्लास्टिक संकलन
रत्नागिरी :जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रमदान मोहीमेतून प्लास्टिक संकलन आणि स्वच्छता सोमवारी (ता. 5) मोहिम जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाकडून राबविण्यात आली. ग्रामस्थ, महिला बचत गट, आशा, मदतनिस यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमध्ये ही मोहिम ठिकठिकाणी यशस्वीपणे राबविली. संकलित केलेला प्लास्टीक कचरा प्रक्रियेसाठी कंपनीना देण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून प्लास्टीक संकलन मोहिम राबवण्यात आली. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणावर उघड्यावर कचरा टाकण्यात येतो. तेथील जागांची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टीक कचरा गोळा केल्यानंतर संबंधित जागेवर येथे कचरा टाकू नये अशा आशयाचे फलक लावण्यात आला आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये एकत्रित गोळा करण्यात आलेला प्लास्टिक कचरा तालुकास्तरावर जमा करून खडपोली एमआयडीसीतील अमर इंडस्ट्रीजला दोन दिवसांनी दिला जाणार आहे. तसेच राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील प्लास्टिक कचरा पुनप्रक्रीयेसाठी झाडगाव एमआयडीसीत पाठवण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, तरुण मंडळ, महिला मंडळ, विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायत मधील हद्दीतील साळवी स्टॉप येथे उघड्यावर कचरा असणार्या जागेची स्वच्छता करण्यात आली. या प्लास्टिक स्वच्छता श्रमदान मोहिमेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी किती किरण पुजार, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत आवळे, कृषी विकास अधिकारीअजय शेंडे यांच्यासह सरपंच ऋषिकेश भोंगले, अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.