जिप शाळेतील विद्यार्थ्यांची ‘नासा’ला भेट
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामधून संशोधक निर्माण व्हावेत, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने नासा अंतराळ संशोधन केंद्राची भेट आयोजित केली होती.
नासा अंतराळ संशोधन केंद्र दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची चाळणी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा चार टप्प्यांत घेण्यात आली. एकूण 28 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. अंतिम फेरीतून नऊ विद्यार्थ्यांची नासा अंतराळ संशोधन केंद्र भेटीसाठी निवड करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. हे नऊ विद्यार्थी आणि सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, विस्तार अधिकारी संदेश कडव सहभागी झाले आहेत.