लक्झरीची कारला धडक; चालकाचा जागीच मृत्यू
खेड:- मुंबई गोवा महामार्गावर खेड रेल्वेस्टेशन जवळ असलेल्या बोरघर गावी आपली फोर्ड इकोस्पोर्ट कार थांबवून डिकीमधील वस्तू काढत असताना चालकाला भरधाव जाणाऱ्या लक्झरीने कारला उडवले. त्यात चालकाचा जागीच त्याचा मृत्यू झाला आहे. मनोज भावसार (रा. पुणे) असं मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
पुणे येथील मनोज भावसार यांच्या आपल्या ताब्यातील फोर्ड इकोस्पोर्ट गाडी (नं एम एच १४ इ सी ८३५५) ही घेवून तुळशी ते खेड भरणे अशी मुंबई गोवा हायवे रोडने घेऊन निघाले होते. याच दरम्यान ते बोरघर गावी हॉटेल वैभव समोर आले असता त्यांनी गाडी रस्त्याच्या खाली थांबवून गाडीच्या मागील डीकीतील काही वस्तु ते काढत होते. याचवेळी मुंबईकडुन गोवा बाजुकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या लक्झरीने कारला धडक देत मनोज भावसार यांना उडवले.
गणराज लक्झरी बस (क्र एम एच ०१ सी आर ३५३५) या लक्झरी बसने कारला भीषण धडक दिल्याने हा अपघात झाला. लक्झरी चालक सुशांत सुखदेव सरकार (वय ४७ वर्षे रा. अंधेरी ईस्ट मुंबई) याने आपल्या ताब्यातील लक्झरी बस भरधाव वेगाने चालवून दुर्लक्ष करुन गाडी हयगयीने बेदरकारपणे चालवल्यामुळे हा मोठा दुर्दैवी अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरती शुक्रवारी सायंकाळी उशिरा हा दुर्दैवी अपघात झाला आहे. हा अपघात झाल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थांनी व खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुणे येथील कारचालक मनोज भावसार कोकणात एका कार्यक्रमाकरता आले होते.
ही धडक इतकी भयानक होती की,मनोज भावसार यांना मागाहून जोराची ठोकर देवून त्यांना गाडीसह लांबवर फरपटत नेले. मनोज भावसार यांना गंभीर दुखापत झाली, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेक जखमा झाल्या मोठा रक्तस्त्राव झाला यातच त्यांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. या सगळ्या अपघात प्रकरणी लक्झरी चालक सुशांत सुखदेव सरकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.