अंमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणी पोलिसांची आणखी एक कारवाई
रत्नागिरी:- अंमली पदार्थ आणि विक्री प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आणखी एक कारवाई केली असून पदार्थ ताब्यात घेतले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही जण अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्याचे सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव यांना देण्यात आल्या होत्या.
काल (दि. १८ मे) निशा जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हेगार म्हणून नोंद असलेला हेमंत पाटील आपल्या दुचाकीने (क्र. एमएच ०८ एए ८९१९) रत्नागिरी शहरात शिवाजी हायस्कूल परिसरात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि शोध घेत असता शिवाजी हायस्कूल ते परटवणे येथील खाडी भागाजवळ असलेल्या झाडी-झुडपालगत एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा आणि तिच्याजवळ हेमंत पाटील उभा होता. पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र पळताना त्याचे दोन्ही मोबाइल खिशातून खाली पडले. तसेच त्याने आपली दुचाकी आणि विक्रीकरिता सोबत आणलेले अंमली पदार्थ व साहित्य तेथेच टाकले.
पोलिसांनी १ किलो ७० ग्रॅम अंमली पदार्थ, एक दुचाकी, २ मोबाइल, २ इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पॅकिंगकरिता लागणारे पाउच आणि साहित्य पंचांसमक्ष जप्त केले. हेमंत पाटीलविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकातील परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील, सहाय पोलीस निरीक्षक मनोज भोसले, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक मुबिन शेख, पंकज खोपडे, श्रीमती कमल दुधाळे, श्रीमती मीरा महामुनी हे अधिकारी तेच श्री. हरचकर, श्री. पाटील, श्री. नारवेकर, अमित पालवे, श्री. कदम यांनी केली.