रेल्वेस्थानकावरील आंबा विक्रेत्यांना दिली तंबी
दुसऱ्या दिवशी मोहीम ; कर्नाटकी विकायचा असेल तर पाटी लावा
रत्नागिरी,ः कर्नाटकमधील आंबा हापूसच्या नावाखाली विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक आंबा बागायतदारांची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.आज सकाळी बागायतदारांनी रेल्वेस्थानकावर धडक देत तेथील स्टॉलधारकांशी संवाद साधला. कर्नाटकी आंबा विकायचा असेल तर तेथे ग्राहकाला समजेल अशी पाटी लावा अन्यथा विकू नका, अशी तंबी दिली.
आंबा उत्पादन कमी असल्याने विक्रेते कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकत असल्याचे पुढे आले होते. या विरोधात बागायतदारांनी मोहीम हाती घेतली आहे. आज सकाळी रेल्वेस्थानकावर धडकलेल्या बागायतदारांना स्थानिक शेतकऱ्याकडून रत्नागिरी हापूस लिहिलेल्या बॉक्समधून कर्नाटकी आंबा दिल्याची माहिती समजली. स्थानकावरील स्टॉलधारकाकडे सुमारे ६० बॉक्स होते. त्या विक्रेत्याकडून बागायतदारांनी संपूर्ण माहिती घेतली. या वेळी स्थानिक बागायतदार निशांत सावंत, प्रशांत सावंत, पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बावा साळवी, धनराज सावंत, श्रेयस सावंत, मंगेश साळवी यांच्यासह अन्य बागायतदार होते.
रत्नागिरी शहरामध्ये बुधवारी सकाळी विक्रेत्यांची झाडाझडती घेतल्यामुळे रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आज फक्त दोनच विक्रेते होते. त्यातील एकाकडे कर्नाटकी आंबा होता. त्या विक्रेत्याने तशी पाटीही लावलेली नव्हती. याबाबत तीव्र नाराजी बागायतदारांनी व्यक्त केली तसेच कर्नाटकी आंबा विकायचा असेल तर तसा फलक येथे लावा जेणेकरून ग्राहक फसणार नाही; परंतु त्या विक्रेत्याने कर्नाटकी आंबा विकणार नाही, अशी ग्वाही स्थानिक बागायतदारांना दिली. आंब्याचे बॉक्स देणाऱ्यांकडूनच आपली फसवणूक झाल्याचेही त्या विक्रेत्याने बागायतदारांना सांगितले. या माहितीच्या आधारे दोन दिवसात आंबा बॉक्स देणाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या मुळात जाणार असल्याचे बागायतदार निशांत यांनी सांगितले.