
रत्नागिरीतही इलेक्ट्रिक एसटी धावणार
रत्नागिरी: सीएनजी बसेस पाठोपाठ रत्नागिरी एसटी विभागात चार ठिकाणी इलेक्ट्रिक बसेससुद्धा दाखल होणार आहेत. रत्नागिरी आगार ३७, दापोली ३६, चिपळूण ३३ आणि खेडला ३१ अशी १३७ गाड्यांची मागणी प्रस्तावित आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची जागासुद्धा निश्चित करण्यात येत आहेत. याशिवाय संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. पुढील तीन- चार महिन्यांत इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदूषण टाळण्यासाठी एसटीच्या गाड्या सीएनजी व इलेक्ट्रिकवर करण्यावर जास्त लक्ष दिले जात आहे. प्रवासी एसटीकडे वळू लागले आहेत. त्यांच्याकरिता अद्ययावत सोयीसुविधा देण्याकडे महामंडळाचे लक्ष आहे. लाल परी या सीएनजीवरील अप्रतिम गाड्याही रत्नागिरी एसटी विभागात कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यातील ३० गाड्या रत्नागिरीत सुरू असून लवकरच रत्नागिरी चिपळूण करिता एकूण १२० गाड्या मिळणार आहेत. एसटीच्या सीएनजीवरील बसेससाठी माळनाका येथे एसटीच्या आवारात सीएनजी पंप उभारण्यात आला असल्याचे बोरसे म्हणाले.
रत्नागिरी एसटी विभागात सध्या ७६० बसेस आहेत. यामध्ये शिवशाही, लाल परी असून इलेक्ट्रिक बसेससुद्धा दाखल होणार आहेत. कोरोना कालावधीत एसटी बंद होती. त्यामुळे झालेले नुकसान आता हळुहळू भरून निघत आहे. प्रवाशांना पुन्हा आकृष्ट करण्यासाठी नवनवीन सोयीसुविधा व अधिक आरामदायी बसेसची निर्मिती केली जात आहे. यामुळे एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा एसटीने प्रवास करेल. सध्या रत्नागिरी विभागात दररोज सव्वादोन लाख प्रवासी नियमित प्रवास करत आहेत. तसेच उन्हाळी सुट्ट्यांमुळे एसटीचे भारमान वाढले आहे, असे बोरसे यांनी सांगितले.