
रिफायनरी समर्थक फार्ड भेटणार उद्धव ठाकरेंना
राजापूरमध्ये दौरा ; फार्डमध्ये ६३ समर्थक संघटना
रत्नागिरी, : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण सुरू आहे तसेच विरोधक आंदोलन करत आहेत. शनिवारी (ता. ६) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारसूला भेट देणार असल्याने त्यांची रिफायनरी समर्थक असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटचे (फार्ड) पदाधिकारी भेट घेणार आहेत. ज्या ठाकरेंनीच बारसूची जागा सुचवली आहे तिथे रिफायनरी व्हावी, असे ठाकरे यांना समजावून सांगण्यात येणार आहे. त्यांनी समर्थन द्यावे, अशी मागणी आहे. रिफायनरी समर्थकांची भूमिका पटवून देण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती आज फार्डतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जनजागृती संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला फार्डचे अध्यक्ष केशव भट, कोमल सिंग, सचिन शिंदे, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई यांनी संबोधित केले. या वेळी भट यांनी सांगितले, बारसू येथे सध्या शासकीय पातळीवर रिफायनरीकरिता सर्वेक्षण जोरात चालू आहे. तेथे रिफायनरी येणे ही आता निव्वळ एक औपचारिकता उरली आहे. रिफायनरी तेथे येणार या भितीने रिफायनरीला पूर्वीपासून कोणताही शास्त्रीय आधार न घेता विरोधासाठी विरोध करणारी मंडळी आता आपली अस्तित्वाची लढाई लढत आहेत. यासाठी काही संघटनांनी तेथील असंघटित ग्रामस्थांना हाताशी धरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. एकीकडे बारसू येथील रिफायनरीसाठी आमचा विरोध असणार नाही आणि तेथे रिफायनरी होण्याकरिता मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला तसे लेखी कळवले होते; परंतु आता सरकार बदलल्यानंतर जर भूमिपुत्रांना तेथे रिफायनरी नको असेल तर मी अशी भूमिका घेतली आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे.
केशव भट म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फार्डने २० जून २०१९ ला आपल्या ६३ समर्थक संघटनांसह ३५०० समर्थकांचा मोर्चा काढला होता. जेथे विरोध असणार नाही तेथे रिफायनरीचे स्वागत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. फार्डने समर्थकांची भूमिका पटवून देण्यासाठी ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे ठाकरे ६ मे रोजी बारसूत येणार आहेत, तेव्हा आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. त्यांनी रिफायनरी समर्थकांना भेट द्यावी. आम्ही त्यांच्याशी संवाद साधू.