
प्रसिद्ध ‘सुपरस्टार सर्कस’चा
रत्नागिरीकर लुटणार आनंद
रत्नागिरी :‘सर्कस है भाई ये सर्कस है’ पण खऱ्या अर्थाने सर्कस चालविणे हे कसरतीचे झाले आहे. सर्कशीत कसरत असते हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु सर्कस चालविणारे सध्याच्या काळात आर्थिक कसरत करीत आहेत असे दिसून येत आहे. अतिशय खर्चिक असलेला लवाजमा आपल्यासोबत आणताना तो सांभाळताना व्यवस्थापकांच्या नाकीनऊ येत असल्याचे दिसत असले तरीही ‘सुपरस्टार सर्कस’चे जोकर रत्नागिरीकरांना खोऽऽ खोऽ हसविणार यात काही तीळमात्र शंका नाही. मुलांच्या परीक्षाही संपल्या आहेत. पर्यटकही रत्नागिरीत स्थिरावताहेत याचा फायदा ‘सुपरस्टार सर्कस’ला होईल, असे अनेकांचे मत आहे.
बऱ्याच वर्षांच्या कालवधीनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना सर्कसचा पाहण्याचा आंनद लुटता येणार आहे. रत्नागिरीतील चंपक मैदान येथे आज दि.5मेपासून
सुपरस्टार सर्कसचे शो सुरु होणार असल्याची माहिती सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वात जास्त फटका सर्कसला बसला आहे. अडीच वर्ष सर्व कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. सर्कस पूर्णत: बंद असल्याने रोजीरोटीसाठी अन्यत्र मजूरी करावी लागत होती. मात्र आता पुन्हा एकदा आम्ही सर्कस उभी केली आहे. रत्नागिरीकरांनी सर्कस पाहण्यासाठी येऊन आम्हाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकाश माने यांनी केले.
न्यायालयाच्या आदेशामुळे सर्कसमध्ये प्राणी ठेवण्यास बंदी आहे. त्यामुळे प्राणी सोडून इतर सर्व खेळ सर्कसमध्ये आहेत. कुडा-गोव्यानंतर आता रत्नागिरीकरही आम्हला प्रतिसाद देतील, असा विश्वास श्री.माने यांनी व्यक्त केला.
सर्कसमध्ये एकूण 50 कलाकार आहे. त्यामध्ये सांगलीसह आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ येथील कलाकारांचा समावेश आहे. आज दि. 5 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्कसचा शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रसिद्ध उद्योजक आण्णा सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राऊल पंडित, तालुकाप्रमुख महेश म्हाप, बिपिन बंदरकर, सरपंच सौ.फरिदा काझी उपस्थित राहणार आहेत. सर्कसचे नियमित 3 शो होणार आहेत, असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.