
रत्नागिरीत ५ मे पासून सुपरस्टार सर्कस
रत्नागिरी : उद्यमगर, चंपक मैदान येथे सुपर स्टार सर्कसचा प्रारंभ दि. ५ मे पासून होणार आहे. या सर्कसमध्ये ५० कलाकार असून ते नेपाळ, आसाम, पश्चिम बंगाल येथील आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बच्चे कंपनीला सुट्टीच आहे. त्यामुळे त्यांनी आवर्जून सर्कस पाहायला यावे. प्राणी नसले तरीही स्टंट, सायकलच्या कसरती, स्टंट, स्कायवॉक, जोकरच्या गमतीजमती, करमणूक म्हणून पाहायला यावे. सायंकाळी ४, ६.१५ आणि ८.३० असे ३ प्रयोग दररोज आहेत. एका वेळेस ८०० ते १००० प्रेक्षक बसू शकतील एवढी बैठक व्यवस्था आहे.
या सर्कसविषयी मालक प्रकाश माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुळचे जत, सांगली येथील माने म्हणाले की, दुष्काळ पडल्यामुळे माझे आजोबा १९३७ मध्ये गाव सोडून सर्कसमध्ये गेले. त्यानंतर वडिलसुद्धा सर्कशीत काम करू लागले. आजोबांनी सर्कस सुरू केली. जय हिंद सर्कस, पृथ्वी, न्यू रॉयल, नटराज, सम्राट अशी या सर्कसची नावे बदलत गेली. मी १९९३ मध्ये न्यू गोल्डन सर्कस सुरू केली. २००० मध्ये प्राण्यांवर बंदी आली. २०१३ मध्ये हत्तीवर बंदी आली आणि २०१९ नंतर कोरोनाचे संकट. यातून सहीसलामत सुटलो आणि सुपर स्टार सर्कस सुरू केली. प्राण्यांवर बंदीमुळे सर्कसचा व्यवसाय ठप्प झाला. अनेकांनी सर्कस बंद केल्या. मीसुद्धा कर्जबाजारी झालो होतो परंतु पुन्हा नव्याने सुरवात केली. कोरोना कालावधीत मी गावाहून कर्नाटक भागात राहायला गेलो. तिथे मोफत जेवणखाण मिळत होते. आता पुन्हा सर्कस सुरू केली आहे. गोवा, कुडाळनंतर आता रत्नागिरीत आलो आहे.
रत्नागिरीमध्येही सर्कससाठी जागा पाहायला आलो होतो. पण योग्य जागा मिळत नव्हती. परंतु उद्योजक किरण तथा भैय्या सामंत यांच्या सहकार्य, मदतीमुळे चंपक मैदानाजवळची जागा मिळाली आहे. रत्नागिरीकरांनी आमच्या कलाकारांच्या कसरती पाहण्यासाठी आवर्जून यावे. ५ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता सर्कसचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी उपस्थित राहणार आहेत, असे माने म्हणाले.