
गावठी हातभट्टी तसेच गोवा बनावट मद्याचे २०० बॉक्स जप्त
रत्नागिरी :- राज्य उत्पादन शुल्क, विभागाने जिल्हयांत आज बुधवार दिनांक २६.०४.२०२३ रोजी दारुच्या हातभट्ट्यांवर सांघीक धाड टाकण्याची कारवाई करण्यांत आली. सदर हातभट्टी विरोधी कारवाई ही रत्नागिरी शहरालगत पाटीलवाडी, व नाखरेवाडी परिसरात करण्यांत आली असून त्यामध्ये गावठी दारु ४० लिटर रसायन ७००० लिटर (३५ बॅरल) जप्त करुन नष्ट करण्यांत आले असून एका इसमास अटक करण्यांत आली आहे. जप्त केलेल्या हातभट्टी, रसायन, दारु व इतर साहित्यांची किंमत सुमारे रु.१.६८.३९०/- इतकी आहे.
निरीक्षक लांजा यांचे पथकाने मौजे. कोर्ले गावच्या हद्दीत (ता. लांजा) राज्य महामार्ग क्रमांक १७५ वर गस्त घालत असतांना गोव्यावरुन मुंबईला जाणारे संशयीत वाहन (अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो) तपासले असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले सुमारे २०० बॉक्स (इंपेरिअल ब्लू व्हिस्की) मिळून आले असून ते जप्त करण्यांत आले व वाहन चालकास चौकशी करिता ताब्यात घेण्यांत आले. जप्त मुद्येमालामध्ये गोवा बनावटीचे इंपेरियल ब्लू ब्रॅन्डचे लेबल असलेल्या १८० मि.ली. मापाच्या सुमारे ९६०० काचेच्या बाटल्यांचा यांत समावेश आहे. सदर मद्याची किंमत रु. १५,३६,०००/- इतकी असून सोबत जप्त करण्यांत आलेल्या वाहनांची किंमत अंदाजे रु.९,००,०००/- इतकी आहे. जप्त करण्यांत आलेल्या मद्य, वाहन व आरोपीच्या ताब्यातील इतर साहित्यांची एकूण किंमत रु.२४,४६,०००/- एवढी आहे.
सदर ताब्यात घेतलेल्या वाहन चालक इसमाचे नांव विचारले असता, विशाल रघुनाथ तुपे रा. खेराडे, तुपेवाडी (विटा) ता. कडेगांव सांगली असे सांगण्यांत आले. त्याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५अ. ई. ८१,९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यांत आला असून अटक आरोपीस मे न्यायालय लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे रिमांडकामी हजर करण्यांत आले आहे.
सदरची कारवाई मा.श्री. विजय सुर्यवंशी साहेब आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा.श्री.सुनिल चव्हाण साहेब संचालक (अंमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशानुसार डॉ. श्री. बी. एच. तडवी मा. विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर व श्री. सागर धोमकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनात झाली असून, सदरची कारवाई श्री. विक्रमसिंह श्रीकांत मोरे, निरीक्षक लांजा यांनी केली असून, कारवाईत श्री. सुधीर भागवत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, लांजा श्री. व्ही. पी. हतिसकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक, व श्री. एस.बी. विटेकर जवान-नि-वाहन चालक यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक श्री. विक्रमसिंह श्रीकांत मोरे करीत आहेत.

नविन आर्थिक वर्षामध्ये अवैध मद्यावर अंकूश ठेवून शासनाचा महसुल वाढवण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रत्यन असून हातभट्टीवर विशेष कारवाया करण्यांत येणार आहेत. अवैध दारुस प्रतिबंध करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली मंजूर असलेली जिल्हास्तरीय समिती देखील या बाबत वेळोवेळी आढावा घेणार आहे. पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क, विभाग अवैध दारु विरोधी लवकरच एकत्रीत मोहीम हाती घेवून “हातभट्टी मुक्त गांव ही संकल्पना राबविण्याच्या तयारीत असून त्याकरिता जनसहभागाचा आधार घेणार आहे.