
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याना आरटीओकडून दणका; ६६ जणांची नोंदणी निलंबित
रत्नागिरी :अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध जोरदार मोहीम सुरूच आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि राज्य परिवहन एसटी महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने दोषी आढळलेल्या १६३ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १७ लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत ६६ वाहनांची नोंदणी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आली आहे. कारवाईत वर्षभरात ५ कोटीचा महसूल मिळाला.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचे महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत आहे. एसटीच्या थांब्याजवळ थांबून प्रवाशांना आपल्याकडे खेचणाऱ्या आणि संख्यामर्यादा ओलांडून त्यांची वाहतूक आरटीओ कार्यालय आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने गेल्या आर्थिक वर्षात अशा वाहनांवर कायद्याचा बडगा उगारत कारवाई केली. त्यांच्याकडून दंडच वसूल केला नाही तर काहींची नोंदणी निलंबन केली आहे.
या कारवाईत २ हजार ६७७ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात १६३ वाहने दोषी आढळले. त्यापैकी १६ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली तर ६६ वाहनांची वर्षभरासाठी नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. काही वाहनांकडून ८ हजार रुपये न्यायालयीन दंड वसूल करण्यात आला तर कर वसुलीतून ३५ हजार ५९ लाख ८०१ रुपये तर १७ लाख ३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. कार्यालयाला विविध वाहनांचे दंड, चालू कर तसचे थकित करापोटी ५०१ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात वाहन चालवताना, मोबाईलवर बोलताना, शालेय विद्यार्थी वाहतूक, अवजड सामानाची वाहतूक करणारे नागरिक आदी विविध कारवाईंचा समावेश आहे. या कार्यालयाला २ कोटी २५ लाख उद्दिष्ट देण्यात आले होते. वर्षभरात या कार्यालयाने ५ कोटी १४ लाखाचे उत्पन्न मिळवले. या संयुक्त कारवाईमुळे दोषी वाहनांवर जबर वचक बसला आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या १९४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७० दोषी वाहनांकडून ४ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला तर १ लाख ३० हजार १७२ करवसुली केली आहे. यापैकी १२ प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत.
अवजड सामानांची विनापरवानगी वाहतूक करणाऱ्या ७ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे तर वर्षभरात तपासलेल्या १३२ वाहनांकडून १ लाख ६६ हजार १६१ रुपयाची करवसुली करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या १९ वाहनांवर कारवाई करत ३ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.