
चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला २० वर्षे सश्रम कारावास
राजापूर: येथील 14 वर्षीय मुलीशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरूणाला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास व 26 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. नीलेश देवजी गुरव (32, ग़ भालावली, ता. राजापूर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार नाटे पोलिसांनी नीलेश याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते.
अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड मेघना नलावडे यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये पीडित मुलगी ही घरामध्ये एकटी असताना आरोपी नीलेश याने घरामध्ये प्रवेश केला. यावेळी नीलेश याने पीडितेजवळ पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. नीलेशला पाणी दिल्यानंतर पीडिता पाण्याचा तांब्या किचनमध्ये ठेवण्यासाठी गेली. या दरम्यान आरोपी नीलेश हा देखील तिच्या मागून किचनमध्ये गेला. यावेळी पीडिता ही घरात एकटी असल्याचा फायदा उठवत नीलेशने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत पीडिता घरात एकटी असताना नीलेशने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडिता ही गर्भवती राहिली, तर 23 ऑगस्ट 2021 रोजी अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आपला गर्भपात झाला, अशी तक्रार पीडितेने नाटे पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नीलेश याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 (1), 506 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) चे 3,4,7,8,11,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
नाटे सागरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी या गुह्याचा तपास केला. तसेच आरोपी नीलेश याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सरकारी पक्षाकडून एकूण 15 साक्षीदार खटल्यादरम्यान तपासण्यात आले. न्यायालयापुढे पैरवी म्हणून नाटे पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर ठोके यांनी काम पाहिले.