
रेल्वे स्टेशन येथून अमली पदार्थ बाळगणाऱ्या तरुणाला अटक
रत्नागिरी : रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तरूणाला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. साहिल हानिफ मेमन (२५, रा. झारणीरोड बैलबाग रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ५१० ग्रॅम गांजा तसेच ११ ग्रॅम हिरॉईन पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेस्टेशन परिसरात गांजा विक्री होणार असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३० मार्च २०२३ रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांचे पथक रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरून बसले होते. यावेळी एक तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या तरूणाची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून गांजा व हिरॉईन असा अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आला.
पोलिसांनी तरूणाची चौकशी केली असता त्याने आपले नाव साहिल हानिफ मेमन असे सांगितले. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी साहिल याच्याविरूद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने साहिल याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.