
रत्नागिरी लायन्स क्लबचे सेवा पुरस्कार जाहीर
रत्नागिरी:- लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे देण्यात येणारे सेवा पुरस्कार जाहीर झाले आहे. यावर्षी गणपतीपुळे ग्रामपंचायत, पावस येथील आनंदी वृद्धाश्रमासह सातजणांना लायन्स सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
लायन्स क्लब रत्नागिरी यंदा आपले सुवर्णहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्या अनुषंगाने वर्षभर लायन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष प्रवीण जैन, सचिव विशाल ठोकळे, खजिनदार रवींद्र प्रसाद आणि सर्व सदस्यांकडून विविध प्रकारचे सेवा उपक्रम राबवण्यात येत आहेत. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध स्तरावर स्थानिक गरजा ओळखून अनेकविध उपक्रम राबवण्यात येत असून गरजूंना त्याचा लाभ होत आहे. लायन्स सेवा पुरस्कार हा मागील काही वर्षांपासून सुरू झालेला उपक्रम या द्वारे समाजात निरपेक्ष सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. एकप्रकारे त्यांनी बजावलेल्या सेवेसाठी त्यांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप! हीच गोष्ट त्यांना अधिक जोमाने कार्यरत होण्यास ऊर्जा देते. यंदा या पुरस्काराचे पाचवे वर्ष. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे याकरिता कोणताही अर्ज करावा लागत नाही. लायन्स सदस्यांची एक समिती समाजात होत असलेल्या चांगल्या कामांची नोंद घेत यासाठी व्यक्ती निवड करण्यात येते. एमजेएफला डॉ. संतोष बेडेकर यांनी वडील (कै.) वामन बेडेकर व आई (कै.) उमा बेडेकर यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार पुरस्कृत केले आहेत. रविवारी (ता. २) एप्रिलला सकाळी ११ वा. रत्नागिरीमधील प्रसिद्ध उद्योजक आणि प्रांत ३२३४ चे माजी प्रांतपाल एमजेएफला उदय लोध यांच्या हस्ते हा सोहळा लायन्स क्लब हॉल एमआयडीसी येथे पार पडणार आहे.
पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात येणार
यावर्षी रोहन वारेकर (सर्पमित्र), सुधीर रिसबूड (कातळशिल्प), रोहित चव्हाण (सुरक्षारक्षक), ग्रामपंचायत गणपतीपुळे, प्रदीप कीर (पुरुष परिचारक), मेंटल हॉस्पिटलच्या सुरेखा नैकर, आनंदी वृद्धाश्रम पावस यांना लायन्स सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.