
सातारा, रत्नागिरीत चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
रत्नागिरी :शाळेसह घरे टार्गेट करून चोऱ्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश करून सहा गुन्हे उघड केले. संशयितांकडून चोरीचा साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयितांनी सातारा जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.
अमर बापूसाहेब देकगुडे (26), शशांक दीपक जाधक (21, दोघे रा. खोकडवाडी, जि. सातारा), संतोष श्यामराव सोनटक्के (25, रा. भांडकली, ता. माण), विनोद निवृत्ती खरात (25, रा. नवीन एमआयडीसी, सातारा मूळ रा. भालकडी, ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यातील वाढत्या घरफोडय़ांमुळे पोलीस संशयितांची माहिती घेत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चोरीचे साहित्य किक्री करण्यासाठी काही संशयित दहिवडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक गस्तीवर असताना टेम्पो व कारमधून आलेल्यांची चौकशी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये साहित्य होते. पोलिसांनी साहित्याबाबत विचारणा केल्यानंतर मात्र त्यांनी ते चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वाहने जप्त केली. वाहनांमध्ये जनरेटर, प्रीज, कॉम्प्युटर, प्रिंटर, सोफासेट, गॅस शेगडी, पितळी मूर्ती, पिठाची चक्की, उसाचे गुऱ्हाळ, दुचाकी असा 10 लाख 45 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींनी रहिमतपूर, औंध, दहिवडी, सातारा तालुका (जि. सातारा) व चिपळूण (जि. रत्नागिरी) पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, फौजदार अमित पाटील, विश्वास शिंगाडे, कॉन्स्टेबल उत्तम दबडे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
मंदिरांप्रमाणे शाळांवरही चोरट्यांचा डोळा
संशयित चोरट्यांनी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली देण्यास सुरुवात केल्यानंतर पोलीसही क्षणभर चक्रावून गेले. कारण, रहिमतपूर पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या हायस्कूलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या साहित्यामध्ये शाळेतील बहुतांश साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदिरे असुरक्षित झाल्याचे वास्तव असताना आता शाळाही चोरट्यांच्या रडारवर आल्याने चिंता व्यक्त होत आहे.