
पंढरीनाथ आंबेरकरचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामिन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आंबेरकर याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
पंढरीनाथ आंबेरकरने १ मार्च २०२३ रोजी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी न्यायालयाकडून दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. यापूर्वी १५ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत आंबेरकर याच्यावतीने युक्तिवाद करणार्या वकिलांनी पत्रकारांच्या मागणी आणि दबावामुळे पोलिसांनी आंबेरकरवर भादंवि कलम ३०२ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तसेच याच्याशी संबंधित एका वृत्तवाहिनीवर आ. सामंत बोलत असल्याची क्लिपही आंबेरकरच्या वकिलांनी सादर केली होती. त्यावेळी न्यायालयाने जामिन अर्जावरील सुनावणीसाठी २० मार्चची तारीख दिली. त्यावेळीही दोन्ही बाजु ऐकून न्यायालयाने सुनावणीसाठी २८ मार्च ही पुढील तारीख दिली होती. मंगळवारी सरकारी पक्षातर्फे अॅड. अनिरुध्द फणसेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी.बिले यांनी पंढरीनाथ आंबेरकरचा जामिन अर्ज फेटाळून लावला.