आंबा घाटाला पर्यायी रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी मंजूर
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील व्यापारी दृष्ट्या महत्वाचा असणाऱ्या आंबा घाटाला पर्याय म्हणून साखरपा देवडे रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी बजेटमध्ये एक कोटी निधी मंजूर झाल्याचे दीपक बेर्डे यांनी सांगितले.
देवडे गावचे रहिवाशी दीपक बेर्डे यांच्या मागणीनुसार आमदार प्रसाद लाड यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वेक्षणासाठी निधी मंजूर केल्यामुळे साखरपा देवडे आंबा रस्ता होण्याची आशा बळावली आहे.
बेर्डे यांनी मागणी लावून धरल्यामुळे अखेर यश प्राप्त झाले. गेल्या वर्षी अतिवृष्टीत आंबा घाट अनेक ठिकाणी कोसळून चौदा दिवस बंद होता त्यामुळे प्रवासी व व्यापारी दृष्ट्या सर्वच यंत्रणा बंद होती, त्यामुळे सततची होणारी आंबा घाटाची अवस्था पाहता पर्यायी मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वेक्षणासाठी बजेटमध्ये निधी मंजूर केल्याबद्दल साखरपा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व जिल्हावासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.