रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वीज कनेक्शन कट केल्याने रुग्णांचे हाल
राजापूर:- जवळपास बारा गावांसाठी उपलब्ध असलेल्या रायपाटण ग्रामीण रुग्णालयाबाबत अनेक समस्या रुग्णांकडून, ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत. कधी डॉक्टर उपलब्ध नसतात, कधी इतर सुविधा उपलब्ध नसतात तर काही दिवसापासून रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारा पंप बंद असल्याने कित्येक दिवस रुग्णांचे पाण्यावाचून हाल देखील होत आहेत. त्यातच शनिवारी 25 मार्च रोजी एका नवीन समस्येला रुग्णांना सामोरे जावं लागलं.
जवळपास दोन लाख चाळीस हजाराच्या आसपास वीज बिल न भरल्याने विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण रुग्णालय रायपाटणचे वीज कनेक्शन कट केल्याने परिसरातील पाचल, कारवली, तळवडे, रायपाटण या गावातील रुग्णालयात ऍडमिट केलेल्या रुग्णांचे हाल झाले होते. याबाबत रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डॉक्टर पंदरकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर रुग्णालयाच्या क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या महिला आठवड्यातून दोन दिवस रुग्णालयात कामकाजासाठी येतात व इतर दिवशी जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने सदर रुग्णालयातील कामकाज अपुरे राहते . त्यामुळे सदर वीज बिल काढण्यासाठी विलंब झाला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले, तर सिव्हिल सर्जन श्रीमती संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधला असता, कोव्हीड कालावधीत रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट जोडला आहे ज्याचा सध्या रुग्णालयाला कसलाच उपयोग नसतो परंतु त्याचे वीज बिल रुग्णालयाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे इतकं भरमसाठ बिलं आल्याचं सांगण्यात आलं. सकाळी अकराच्या सुमारास कट केलेले ग्रामीण रुग्णालय रायपाटणचे वीज कनेक्शन सोमवारी वीज बिल भरण्याच्या आश्वासनानंतर रात्री दहा वाजता परत जोडण्यात आले. रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांचा कॉल आल्याने वीज कनेक्शन जोडण्यात आल्याचे विद्युत वितरण कंपनीचे पाचल शाखा अभियंता श्री बनगर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.