
राजापुरात गोवा बनावटीची 2 लाखाची दारू जप्त
राजापूर : बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्गातील एका वृद्धावर राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २ लाख ०१ हजार ४८८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली असून प्रदीप विश्वनाथ निग्रे (५७, रा. खारेपाटण, कोष्टेआळी, कणकवली) याला नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणी रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल भीम कोळी यांनी फिर्याद • दिली. प्रदीप निग्रे हा मारुती ओमनी (एमएच ०७, एजी ३०२) या गाडीतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत होता. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे गावातील ताम्हणकरवाडी येथील बसथांब्याजवळील रस्त्यावर पोलिसांनी त्याची गाडी तपासणीसाठी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची बिगरपरवाना दारू असल्याचे दिसले. पोलिसांनी ५६४ सीलबंद बॉटल जप्त केल्या असून त्यांची किंमत २६,४८८ रुपये इतकी आहे. या दारूसाठ्यासह १ लाख ७५ हजार रुपये किंमतीची गाडीही पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसात महाराष्ट्र दारू अधिनियम कलम ६५ (ए) (ई), नुसार गुन्हा नोंद झाली आहे. तसेच प्रदीप निग्रे याला सी.आर.पी.सी. ४१ (१) (अ) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.